योगेश शेंडगे
शिक्रापूर : हल्लीच्या फास्ट युगात फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव येथे रस्त्याच्या कडेला स्वीट होमचा सुळसुळाट झाला असुन यामध्ये मोठया प्रमाणात फास्ट फुड, जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ विकले जातात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून रांजणगाव येथील एका स्वीट होमच्या मिठाईत मेलेली अळी सापडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
शिरुर तालुक्यात सध्या झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं आहे. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून कामगार वर्ग औद्योगिक वसाहतीत पोटाची खळगी भरण्यासाठी येत आहेत. कोरेगाव भिमा, वढु बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापुर, कोंढापुरी, रांजणगाव गणपती आणि करडे परिसरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या उभ्या राहिल्या असुन त्यामध्ये लाखो कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
त्यामुळे या औद्योगिक वसाहतीच्या परीसरातील गावांमध्ये मोठया प्रमाणात स्वीट होम आणि छोट्या- मोठ्या टपऱ्यावर फास्ट फुड तसेच जंक फुड खाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मात्र, यामध्ये मिळणारे खाद्यपदार्थ खरचं दर्जेदार आहेत का? याची खात्री न करताच सर्वसामान्य लोक हे खाद्यपदार्थ खाऊन स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गंभीर आजरांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे स्वीट होम किंवा टपरीवरुन कोणताही खाद्यपदार्थ विकत घेताना त्याचा दर्जा तपासने गरजेचे आहे.
मिठाईत सापडली मेलेली अळी
रांजणगाव गणपती येथे असलेल्या जय भवानी मिठाईवाले या स्वीट होममधून १४ मे रोजी एका ग्राहकाने मुलांना खायला मिठाई नेली होती. त्यामध्ये मेलेली अळी सापडल्याने त्या ग्राहकाने याबाबत स्वीट होम चालविणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला. त्यावेळी त्याने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर स्वतःची चुक मान्य केले.
अन्न, औषध विभागाची डोळेझाक
पुणे जिल्ह्यासह शिरुर तालुक्यात हा सगळा सावळा गोंधळ सुरु असताना अन्न आणि औषध प्रशासन विभाग मात्र डोळेझाक करत आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. तालुक्यातील स्वीट होम मालकाकडे फुड लायसन्स आहेत का? तसेच त्यामध्ये बनवले जाणारे पदार्थ दर्जेदार बनवले जातात का? याची तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा फास्ट फुड आणि जंक फुडच्या नावाखाली दर्जाहिन पदार्थ विकून सर्वसामान्य ग्राहकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ थांबनार कधी? असा प्रश्न निर्माण होत आहे.