पुणे : माळशेज घाटात एक मोठी दुर्घटना घडल्याचे वृत्त समोर येत आहे. कल्याण-नगर महामार्गावर माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी ११ जून रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घाटातील गणेश मंदिराजवळ घडली आहे. या घटनेत चुलता- पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
राहुल भालेराव (वय-37) आणि त्याचा पुतण्या स्वयंम भालेराव (वय-6) अशी मृतांची नावे आहेत. तर बाजूलाच बसलेली आई विमल भालेराव (वय-58), वडील बबन भालेराव (वय-62) व भाऊ सचिन भालेराव (वय-40, सर्व रा. घाटीपाडा नं. 2 वाळकाबाई चाळ, बिहार रोड, योगीहील, मुलुंड, प. मुंबई ) हे थोडक्यात बचावले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथे राहत असणारे कुटुंब रिक्षातून आपल्या मूळ गावी नगर जिल्ह्यातील संगमनेर हद्दीतील चंदनापुरीला मुलांचे जातीचे दाखले काढण्यासाठी गावी निघाले होते. माळशेज घाटातून प्रवास करत असताना सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रिक्षावर दरड कोसळली.
यामध्ये मुलगा व नातवाचा आई-वडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह ओतूर येथील सरकारी दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले आहेत.