लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने चाललेल्या पिकअपने दुचाकीवरील दाम्पत्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळभोर लॉन्स च्या समोर गुरुवारी (ता.30 मे) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या लोणी काळभोर येथील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
प्रल्हाद किसनराव लाड (वय 45 फ्लॅट नं. 501. श्री साई अपार्टमेंट, पाषाणकर बाग, लोणीकाळभोर ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शालन प्रल्हाद लाड (वय 44) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल अशोक शेळके (रा. शेळकेववस्ती, तांदळी दुमाळा, श्रीगोंदा जि. अहमदनगर) या वाहनचालकावर रविवारी (ता.2) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शालन लाड या नोकरी करीत असून त्या आपल्या कुटुंबासोबत लोणी काळभोर येथे राहतात. दरम्यान, शालन लाड व त्यांचे पती प्रल्हाद लाड हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यांचे काम आटोपून जोडपे घरी चालले होते.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून, पुण्याकडून लोणी काळभोरच्या दिशेकडे जात असताना, त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळभोर लॉन्स च्या समोर आली असता, त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने चाललेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. व पिकअप चालक राहुल शेळके याने कोणत्याही स्वरुपाची वैदयकिय मदत न करता पळून गेला.
दरम्यान, या अपघातात प्रल्हाद लाड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना त्वरीत उपचारासाठी एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रल्हाद लाड यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पिकअप चालक राहुल शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.