पुणे : पुण्यातील रिक्षाचालकाने सर्वत्र कौतुक होत आहे. रिक्षामध्ये सापडलेली एका महिलेची बॅग आणि त्यामध्ये असेलेला १ लाख १० हजार रूपयाचा ऐवज रिक्षा चालकाने मुंढवा पोलिस ठाण्यात जमा केला आहे. नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, पुणे. मळ रा. नेवासा, जि. अहमदनगर) असं त्या इमानदार रिक्षा चालकाचे नाव आहे. त्यांचा मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रिक्षा चालक नवनीत गुगळे हे खराडी ते हडपसर असे भाडे घेवून जात होते. यावेळी मुंढवा ओव्हरब्रिजवर त्यांना एक लेडीज बॅग आढळून आली. त्यांनी कोणताही लोभ न करता सदरची बॅग आणि त्यामध्ये असलेले साहित्य मुंढवा पोलीस ठाण्यात जमा केला आहे. या बॅगमध्ये अॅपल कंपनीचा लॅपटॉप, चार्जर, मोबाईल चार्जर, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, गाडीचे आरसी बुक आणि इतर महत्वाचे कागदपत्रे असा एकुण १ लाख १० हजार रूपयाचा ऐवज होता.
बॅगमध्ये असलेल्या आरसी बुकवरील आरटीओ नंबरवरून पोलिसांनी वाहन मालकाचे नाव आणि मोबाईल नंबर प्राप्त करून पोलिसांनी ममतोष प्रकाश (रा. पटना) यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी त्यांची मुलगी माही मुस्कान ही अॅमेनोरा सिटी येथे राहण्यास असून ती गाडी वापरत असल्याचे सांगितले. मुंढवा पोलिसांनी माही मुस्कान यांच्याशी संपर्क साधून त्याला सर्व ऐवज परत केला.
ही कामगिरी पोलिस आयुक्त अतितेश कुमार, सह आयुक्त प्रविण पवार, अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, सहाय्यक पोलिस फौजदार रमेश उगले, पोलिस अंमलदार निलेश पालवे, सचिन अडसुळ आणि इतर कर्मचार्यांनी केली.