पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. शहरात सुमारे १९० महाविद्यालयांमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रांसाठी मान्यता मिळाली आहे. पुण्यातील आझम कॅम्पस येथील आबेदा इनामदार महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र आहे. मात्र, हा परिसर अत्यंत गजबजलेला असून, येथे वाहनांची वर्दळ असल्याने सतत हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, ट्रॅफिक जॅम, वाहनचालकांची आरडाओरड यामुळे पेपर लिहिताना मुलांच्या एकाग्रतेचा भंग होत आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होणार असल्याने, संबंधितांनी याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून होत आहे.
शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्राची निवड करताना, विद्यार्थ्यांना विनाअडथळा, शांततेत पेपर लिहिता येतील, याची खात्री करूनच योग्य निवड करावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राबाहेर रस्त्यावर सतत ट्रॅफिक जॅम होत असते. परिणामी वाहनांचे हॉर्न वाजत असतात. वाहनचालकांची शिवीगाळ, रिक्षावाल्यांचे वाद, फेरीवाल्यांचा आवाज, शेजारील दुकानदारांनी लावलेल्या टेपरेकॉर्डवरील मोठ्या आवाजातील गाणी शिवाय गॅरेजवाले जोरजोरात गाड्या रेस करून, हॉर्न वाजवून गोंगाटात आणखी भर घालत असतात. परिणामी परीक्षार्थींच्या एकाग्रतेचा भंग होत आहे.
वास्तविक पाहता बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी असते. या परीक्षेदरम्यान वातावरणात गजबज असल्यास बोर्डाच्या परीक्षार्थींना बोर्डाचे पेपर लिहिणे खूपच कठीण जात असून, मुलांचे भवितव्य अंधारात असल्याची भिती पालक व्यक्त करत आहेत.
या समस्येची सर्व संबंधितांनी गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. तसेच बोर्डाने परीक्षा सेंटर ठरवताना परीक्षार्थींना कोणताही त्रास होणार नाही असेच सेंटर निवडावे, जेणेकरून परीक्षार्थींना शांत डोक्याने पेपर लिहिता येतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.