भिगवण : बारामती- राशिन (राज्यमार्ग 54) रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या चुकीच्या धोरणामुळे येथील ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येथील तुषार क्षीरसागर, जावेद शेख, संजय देहाडे, आप्पासाहेब गायकवाड, पिंटू शेलार, गणेश पवार, सुरज खटके, किरण रायसोनी व इतर ग्रामस्थांनी भिगवण हद्दीतील रस्त्याचे काम बंद केले होते.
जुन्या भिगवण मधील हनुमान व महादेव मंदिर स्थलांतर करून देणे, भैरवनाथ मंदिर रॅम्प करून देणे, गावाची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तयार करून देणे, ड्रेनेज लाईन तयार करणे, अंतर्गत जोडरस्ते तयार करून देणे अशा विविध मागण्यांसाठी या रस्त्याचे काम बंद केले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्याची ठाम भूमिका घेण्यात आली होती.
यावर तोडगा काढण्यासाठी व्ही. एच. खत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मधुकर सुर्वे व ग्रामस्थ यांच्यामध्ये 11 जुलै रोजी भिगवण ग्रामपंचायतीमध्ये बैठक पार पडली. यामध्ये मागण्या मान्य केल्यावरच काम चालू करा अशी ठोस भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली. यावर संबंधित कंपनीने वरील मागण्यांची दखल घेत ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करण्याबाबतचे लेखी पत्र आणि मंदिर स्थलांतर व व्यवस्थापन करण्यासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश खत्री कन्स्ट्रक्शनचे प्रतिनिधी रणजित खरतोडे आणि संतोष बालगुडे यांनी ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केला.
यावेळी सरपंच दीपिका क्षीरसागर, तृप्ती जाधव, प्रतिमा देहाडे, तुषार क्षीरसागर, जावेद शेख, संजय देहाडे, रमेश धवडे, गुराप्पा पवार, सत्यवान भोसले, पिंटू शेलार, मनोज राक्षे, राजू हगारे, सुनील धवडे, प्रवीण गाडे, प्रताप भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. या कामासाठी 5 लाख रुपयांचा धनादेश थेट सरपंच ग्रा.प भिगवण यांच्या खात्यावर घेऊन सार्वजनिक कामाची पद्धत नव्याने रुजवल्याने संबंधित पदाधिकारी व ग्रामस्थाचे आभार आप्पासाहेब गायकवाड यांनी व्यक्त केले.
“भिगवण मधील ग्रामस्थांनी पाण्याची पाईप लाईन दुरूस्त करणे, ड्रेनेज लाईन व्यवस्था करून देणे, अंतर्गत जोड रस्ते तयार करणे, जुन्या भिगवण मधील मंदिर व्यवस्थापन करून देणे अशा विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी भिगवण-राशीन रस्त्याचे काम बंद केले होते. कंपनीने ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्या असून मंदिर व्यवस्था पण करण्यासाठी पाच लक्ष रु.चा धनादेश व्ही.एच.खत्री कंपनी कडून ग्रामपंचायतीस प्राप्त झाला असून त्यातून हनुमान मंदिर व महादेव मंदिराचे काम करण्यात येणार आहे.”
– दीपिका क्षीरसागर, सरपंच- भिगवण