पुणे : नागपूर येथील भूमी अभिलेख विभागाचे तत्कालीन उपसंचालक आणि त्यांची पत्नी या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. संपादित केलेल्या मालमत्तेबाबतची चौकशी करून त्यामध्ये उत्पन्नापेक्षा 18 टक्के अधिक जास्त संपत्ती आढळून आली आहे. ही संपत्ती त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमावली असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादाभाऊ सोनू तळपे (वय-62, तत्कालीन उपसंचालक, भूमी अभिलेख, नागपूर विभाग ) आणि त्यांची पत्नी कल्पना दादाभाऊ तळपे (वय-58, दोघे रा. येरवडा, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक दादाभाऊ तळपे हे भूमी अभिलेख विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते नागपूर विभागाचे उपसंचालक असताना त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयाकडून उघड चौकशी केली होती.
तळपे यांनी संपादित केलेली मालमत्ता ही कायदेशीर स्त्रोताद्वारे घेतली आहे का? याबाबत त्यांना वेळोवळी संधी देवून माहिती घेण्यात आली होती. मात्र, त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ठोस पुरावे सादर करु शकले नाहीत.
दादाभाऊ तळपे हे शासकीय सेवेत असताना कायदेशीर उत्पन्नापेक्षा स्वतःचे तसेच पत्नी कल्पना तळपे यांचे 18.74 टक्के उत्पन्न अधिक आढळून आले आहे. ही रक्कम 28 लाख 52 हजार 541 रुपये इतकी असून ही अपसंपदा त्यांनी भ्रष्ट मार्गाने संपादित केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
ही बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी तळपे यांना त्यांच्या पत्नीने सहाय्य केल्यामुळे दादाभाऊ तळपे आणि त्यांची पत्नी कल्पना तळपे यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करत आहेत.