पुणे : अल्पसंख्याक समुदायाच्या प्रमुखांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज, सद्गुरू श्री गंगागिरी महाराज संस्थान (सराला वेट, ता. श्रीरामपूर, जि. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एक जमाव खडक पोलिस ठाण्यात २० ऑगस्ट रोजी जमला होता. दरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ११० ते १२० जणांवर गुन्हा दाखल केला आहे
याप्रकरणी पोलिस हवालदार कुलदीप विठ्ठलराव पवार (वय ३९) यांनी एमआयएम पक्षाचे उपाध्यक्ष आरोपी शोएब इस्माईल शेख (वय ६२, रा. घोरपडे पेठ), माजी नगरसेवक मुनाफ शेख, बहुजन विकास आघाडी, पुणे शहराध्यक्ष मुनव्वर कुरेशी, मास मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष विजय जगताप यांच्यासह ११० ते १२० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगिरी महाराज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कोणतीही विहित परवानगी न घेता संगनमताने बेकायदेशीर जमाव खडक पोलिस ठाणे येथे जमवण्यात आला. मोठमोठ्याने घोषणाबाजी करून धर्म, वंश, भाषा इत्यादी कारणावरून जातीय तेढ निर्माण होईल अशी कृती केली. सार्वजनिक शांतता भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (२) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.