सागर जगदाळे
भिगवण : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने, आचार्य परमहंस यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी इंदापुरमधील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भिगवण पोलिसांना निवेदन देऊन गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन उभे करणार असल्याचे प्रवक्ते दादासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अयोध्येतील मठाधीपती स्वामी परमहंस यांनी ठार मारण्याची धमकी दिली असून, जितेंद्र आव्हाड यांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. स्वामी परमहंस यांनी शनिवारी (ता. ६) एका दूरचित्रवाहिनीवर बोलताना ‘आव्हाड यांचा मी वध करेन’ असा उल्लेख केल्याने त्यांच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करावा. आज देशातील वातावरण माहिती आणि अभ्यासापेक्षा भावना आणि श्रद्धेवर आधारले आहे. यामुळे आव्हाड यांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, गृह विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास देश एका अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला मुकू शकतो. यामुळे गुन्हा नोंद करुन या प्रकारास आळा घालावा, अशी मागणी दादासाहेब थोरात यांनी केली आहे.
आचार्य स्वामी परमहंस यांच्यावर गुन्हा नोंदवावा यासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देऊन गुन्हा नोंदवण्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या प्रकरणाची योग्य दखल घ्यावी आणि समतावादी विचारांना स्वातंत्र्य मिळावे यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्याचे प्रयत्न करावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर लवकरात लवकर योग्य कार्यवाही व्हावी, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने जनआंदोलन करावे लागेल असेही नमूद कले आहे.