दौंड : तालुक्यातील मौजे देऊळगाव गाडा येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच विजया बारवकर, सोमनाथ बारवकर, जालींदर बारवकर, ज्ञानेश्वर वाघापुरे सर्व (रा. देऊळगाव गाडा, ता. दौंड जि. पुणे) यांच्या विरुद्घ अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली. फिर्यादी नवनाथ मोरे (वय-47) (रा. देऊळगाव गाडा) यांनी तक्रार (दि.22 जुलै) केली आहे. या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मौजे देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीची 24 जून 2024 रोजी मासिक सभा होती. त्यावेळी विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेसाठी उपस्थित होते. त्यादरम्यान फिर्यादी नवनाथ मोरे हे अपंग असल्याने ग्रामपंचायत कडून व्हिल चेअर मिळण्याबाबत मागणी केली होती. तेथे उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांनी फिर्यादी मोरे यांना व्हिल चेअर देण्याबाबत समंती दिली. परंतु सरपंच विजया बारवकर आणि त्यांचे पती सोमनाथ बारवकर यांनी फिर्यादीस व्हिल चेअर देण्यास नकार दिला.
सरपंच विजया बारवकर व त्यांचे पती सोमनाथ बारवकर हे मासिक सभा संपल्यानंतर फिर्यादी मोरेच्या घरासमोर जाऊन फिर्यादीस म्हणाले, तुमची मांगा महाराची लायकी नाही ग्रामपंचायत मध्ये येण्याची व निर्लज्यासारखे काही मागणी करण्याची असे म्हणून फिर्यादीच्या घरासमोर जातिवाचत शिवीगाळ केले. तसेच मोरे यांचा अपमान करुन निघून गेले. त्यानंतर दुस-या दिवशी 25 जून 2024 रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास मी (फिर्यादी) घरी जात असताना ग्रामपंचायत देऊळगाव गाडा या व्हॉट्सअप ग्रुपवरती सोमनाथ बारवकर यांनी मेसेज केला की, तुम्हा महार मांगची लायकी नसलेल्यांनी चार वर्षाचा ग्रामपंचायत कर भरता येत नाही. त्यांनी आमचे विषयी व ग्रामपंचायत विषयी बोलणे किती निर्लज्जपणाचे आहे.
यावरुन त्यांची लायकी काय आहे हे सर्वांना कळले असेल. त्यांना आम्हाला उत्तर द्यायची वेळ आली आहे. असा मेसेज केला आहे. त्यावरती आमचे गावामधील विजया बारवकर, सोमनाथ बारवकर, जालींदर बारवकर, ज्ञानेश्वर वाघापुरे यांनी परत फिर्यादीच्या मेसेजला लाईक करुन भावना दुखवतील हे माहित असताना त्या मेसेजचे समर्थनार्थ मेसेज लाईक केले आहे. फिर्यादी पाटस पोलीस औट पोस्ट येथे असताना सदर विषयाबाबत चर्चा केली.
तेव्हा काही लोकांनी चुकीचे वर्तन केले असल्याचे नमूद करण्यात आले. सोमनाथ बारवकर यांनी ग्रामपंचायत देऊळगाव गाडा या व्हॉट्सअप ग्रुपवरती माझा अपमान होईल असे काही बोललास, तर अशा ग्रामस्थावरती तक्रार केली जाईल. अशी धमकी दिली. असे नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास तपासी अधिकारी घोलप, यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार सहा. फौज. बगाडे हे करत आहे.