-बापू मुळीक
पुरंदर(पुणे) : पुरंदर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघीरे हायस्कूल, सासवड आणि दिवे येथील श्रीराम गुरुकुल विद्यालयातील कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवे येथील श्रीराम गुरुकुल पाठशाळा येथे वेदमंत्राचे गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथील विद्यार्थ्यांना सांभाळण्याची व काळजी घेण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे. तरीदेखील तेथील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
यातील आरोपी नामे मंदार शहरकर (पुर्ण नाव माहीत नाही) (रा. दिवे ता. पुरंदर जि. पुणे) याने विद्यार्थी जेवण करीत नाही. शाळेत मुलांसोबत भांडणं करत असतो असे म्हणून विद्यार्थ्याला काठीने पाठीवर, पायावर मारहाण केली. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे वाघिरे हायस्कूल येथे गणिताच्या तासादरम्यान गणिताचे शिक्षक गणेश पाठक यांनी मुलांना गणिताच्या वह्या बेंच वरती काढून ठेवायला सांगितल्या. परंतु विद्यार्थी हर्षल याची वही घरी राहिली म्हणून तो शांत बसला होता. तेव्हा शिक्षक गणेश पाठक यांनी वह्या चेक करत असताना हर्षल याच्या डाव्या कानाला जोरात कानाखाली मारली. हर्षलला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी हर्षलच्या कानाचा पडदा फाटला. अशा घटना घडल्या असून यासंदर्भात संशयित आरोपी गणेश पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपीच्या विरोधात बालकांचे हक्क या कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत