लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जनावरांची क्रूरतेने व दाटीवाटीने टेम्पोमध्ये कोंबून वाहतूक केल्याची घटना समोर आली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी कॉर्नर येथे रविवारी (ता.28) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजय अशोक दवंगे (वय 32, मु.पो. तरडवस्ती महमंदवाडी हडपसर पुणे) व सद्दामहुसेन मस्तानसाहब जातकर (वय 35, मु.पो. कुडचीता. रायबाग जि. बेळगांव कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भिमसेन रामचंद्र कुंटेवाड (वय 33, पोलीस अंमलदार, नेमणूक लोणीकाळभोर पोलीस ठाणे) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भिमसेन कुंटेवाड हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. कुंटेवाड हे रविवारी कर्तव्य बजावीत असताना, त्यांना जनावरांची क्रूरतेने व दाटीवाटीने टेम्पोमध्ये वाहतूक होत आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एमआयटी कॉर्नर येथे सापळा रचून मोठ्या शिताफीने आयशर टेम्पो पकडला.
दरम्यान, आयशर टेम्पोमध्ये काळया रंगाच्या 09 म्हशी क्रूरतेने व दाटीवाटीने कोंबल्याचे दिसून आले. तसेच टेम्पोमध्ये जनावरांसाठी चारापाणी व औषधोपचाराची व्यवस्था आढळून आली नाही. तसेच जनावरे वाहतुकीचा कोणताही परवाना न घेता, जनावरांची वाहतूक करताना मिळून आले. पोलिसांनी या कारवाईत टेम्पोसह सुमारे 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी भिमसेन कुंटेवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चालक अजय दवंगे आणि शेती व पशुपालन व्यावसायिक सद्दामहुसेन जातकर यांच्यावर प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजस जगदाळे करीत आहेत.