लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथील होर्डिंग्ज कोसळल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता.18) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. तर एका घोड्याला ही गंभीर मार लागला आहे. याप्रकरणी जागामालक व होर्डिंग उभारणाऱ्या दोन ठेकेदारांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश लक्ष्मण लोंढे (वय 35, गंजपेठ, गुरुवारपेठ पुणे), अक्षय सुरेश कोरवी (वय 20, अप्पर डेपो विबवेवाडी पुणे) व भारत शंकर साबळे (वय 70, ताडोवाला रोड बंडगार्डन पुणे) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे (वय-29, रा.लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार गुलमोहर लॉन्सचे मालक शरद ज्ञानेश्वर कामठे, (जागामालक, रा. लोणी काळभोर, ता. हवेली), सम्राट ग्रुपचे संजय संभाजी नवले (रा. खराडी पुणे) व बाळासाहेब बबन शिंदे (रा. डेक्कन, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद कामठे यांची कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीत गट क्र. 914 मध्ये स्वत:च्या मालकीची जागा आहे. हि जागा पुणे सोलापूर महामार्गालगत व पुणे शहरापासून अगदी जवळ असल्याने, कामठे यांनी या ठिकाणी गुलमोहर लॉन्स या नावाने विवाह कार्यालय बांधले आहे. तसेच गुलमोहोर लॉन्स समोरील पार्कींग जवळ अंदाजे 40 बाय 40 फुट लांबी-रुंदीचे जाहीरातीसाठी लोखंडी सांगाड्याचे होर्डिंग्ज उभारले आहे. आणि हे होर्डिंग्ज उभारण्याचे व जाहिराती बदलण्याचे काम सम्राट ग्रुपचे संजय नवले व बाळासाहेब शिंदे यांना देण्यात आले होते.
दरम्यान, गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी एक विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी पुण्यातील एका वाद्य पथकाला सुपारी देण्यात आली होती. या सोहळ्यात वाद्य वाजविण्यासाठी पथक येथे आले होते. यावेळी गुलमोहरच्या समोरील अंगणात वाजंत्री बसले होते. तेथेच एका झाडाखाली घोडा गाडी बांधण्यात आली होती.
शनिवारी (ता.18) दुपारी साडे चार वाजण्याचा सुमारास अवकाळी पाऊस व वादळी वारा सुरु झाला. या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेले महाकाय होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली वाजंत्री मंगेश लोंढे, अक्षय कोरवी व भारत साबळे असे तिघेजण सापडले. अडकलेल्या तिघांनाही नागरिकांनी तत्काळ बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत पांढरा घोडाही किरकोळ जखमी झाला आहे. तर पिकअप व ज्युपीटर या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, गोपनीय हवालदार रामदास मेमाणे, अंमलदार अजिंक्य जोजारे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे होर्डिंग्ज सक्षम प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता, स्ट्रक्चरल ऑडीट न करता व कमकुवत लोखंडी सांगाडा रचून नागरीकांचे जिवीतास धोका निर्माण होईल असे बांधण्यात आल्याचे समोर आले.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुलमोहर लॉन्सचे मालक दोन ठेकेदारांवर शरद कामठे, ठेकेदार संजय नवले व बाळासाहेब शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घाटकोपर येथे होर्डिंग्ज कोसळून 18 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता.13) उघडकीस आली होती. हि घटना ताजी असतानाच गुरुवारी (ता.17) पिंपरी चिंचवड मधील मोशीत होर्डिंग्ज कोसळले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता शनिवारी (ता.18) लोणी काळभोर येथील गुलमोहर लॉन्सचे होर्डिंग्ज कोसळून तिघेजण जखमी झाले आहेत. तर घोड्यालाही मार लागला असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळ या सर्व धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्ज मुळे नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट
पुणे शहरासह पुणे-सातारा, पुणे-नगर, पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर, पुणे मुंबई या महामार्गांवर असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावण्यात आलेले आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावलेले होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवासी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मात्र, या अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज वर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने ”हाताची घडी अन् तोंडावर बोट” अशी भूमिका स्वीकारली आहे का? त्यांच्यातील अर्थपूर्ण हितसंबंधामुळे कारवाई होत तर नसेल ना? अशा वेगवेगळ्या चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहेत.