अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : येथील MIDC तील जामिल स्टील बिल्डिग इंडिया प्रा. लि. कंपनीत जड जॉब हाताळता न आल्याने शिवबाबू कमलेश शाहू (वय 23) मुळ रा. मनकापुर, ता. मजखनपुर, जि. कोसंबी (उत्तरप्रदेश) याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर जयदेव मांडे तसेच बिल्डिंग विभागाचे सुपरवायझर ज्ञानेश्वर शेंडे यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी कायदेशीर फिर्याद दिली आहे.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.23 जुन 2024) रोजी रात्री 9 च्या सुमारास जामिल स्टील बिल्डिंग इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये जयदेव मांडे (रा. सासवड, व्यंकटेश स्वप्ननगरी, ता. पुरंदर जि. पुणे) तसेच ज्ञानेश्वर शेंडे सध्या (रा. रांजणगाव ता. शिरुर, जि. पुणे) यांनी कंपनीतील कामगारांना सुरक्षिततेची साधने पुरविली नाहीत. तसेच कामगार सुरक्षिततेच्या साधनांचा वापर केला नाही.
तसेच कंपनीतील कामाची पद्धत असुरक्षित असुन कामगारांना जड जॉब हाताळण्याचे प्रशिक्षण न देता तसेच सदर ठिकाणी कुशल कामगाराची नेमणूक न करता अकुशल कामगाराकडुन कंपनीमध्ये काम करुन घेऊन निष्काळजीपणा केला. त्यामुळे शिवबाबु कमलेश शाहू (वय 23) याच्या अंगावर जड जॉब पडून त्यात तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जयदेव मांडे आणि ज्ञानेश्वर शेंडे यांच्या विरुद्ध रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीळकंठ तिडके हे पुढील अधिक तपास करत आहेत.