लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी व बसचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ॲक्सिस बँकेसमोर, सोमवारी (ता.10) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात नर्सिंगची विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पीएमपीएल चालकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरी शामराव लाटे (वय-20 वर्ष, रा. एम.आय.टी. स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन, ता. हवेली जि.पुणे) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर पीएमपीएल चालक सोमनाथ बाळासाहेब बसाटे (वय-45 रा महारूद्रा वास्तु कवडीपाट टोलनाका ता. हवेली जि पुणे) व दत्ताराम रमेश कांबळे (वय-34, गंगानगर फुरसुंगी हडपसर पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी ज्ञानेश्वरीचा मामा शिवराम बन्सी कराड (वय-38, रा. एम.आय.टी. स्टाफ क्वार्टर, लोणी स्टेशन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवराम कराड व ज्ञानेश्वरी लाटे हे दोघे नात्याने मामा-भाची आहे. ज्ञानेश्वरी ही वाघोली येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. तर ती मामाकडे राहत होती. व दररोज मामा तिला कॉलेजला जाण्यासाठी दुचाकीवरून बस स्टॉपपर्यंत सोडवीत होते.
नेहमीप्रमाणे शिवराज हे भाची ज्ञानेश्वरीला बस स्टॉप वर सोडवण्यासाठी दुचाकीवरून सोमवारी (ता.10) सकाळी निघाले. पुणे सोलापूर महामार्गावरून हडपसरच्या दिशेने चालले होते. त्यांची दुचाकी कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील ऐटुझेड कलेक्शन समोर आली असता, तेव्हा एचपीसीएल कॅन्टीन मॅनेजर दत्ताराम कांबळे यांनी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी फिर्यादी कराड हे रस्त्याच्या उजव्या बाजुला पडले. तर भाची ज्ञानेश्वरी गाडीवरून उडून पीएमपीएल बसच्या चाकाच्या समोर पडली. व पीएमपीएल बसने ज्ञानेश्वरीला 10 ते 12 फुट फरपटत नेले.
दरम्यान, या अपघातात ज्ञानेश्वरी लाटे हि गंभीर जखमी झाली असून तिच्यावर लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ज्ञानेश्वरीच्या दोन्ही खुब्यांना व मणक्यास गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहेत. तसेच तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी शिवराम कराड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.