अक्षय टेमगिरे

रांजणगाव गणपती: शिरुर नगरपरिषदेच्या हद्दीतील शासकीय जागेला संरक्षित करण्यासाठी करण्यात आलेल्या सिमेंटच्या कंपाऊंड वॉलची तोडफोड केल्याबाबत व कचरा डेपो येथील कचरा पेटविल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो) येथील सिमेंटचे कंपाऊंड वॉल दि.२२ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री अज्ञात इसमाने तोडफोड केल्याचे सदर ठिकाणी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये निदर्शनास आले. त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात इसमाविरुध्द शासकिय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच कचरा डेपो येथील कचरा पेटविल्याप्रकरणी सुध्दा अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिरुर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतील स्वमालकीच्या व शासकीय जागेस चहूबाजूने सिमेंटच्या कंपाऊंड वॉल लावून संरक्षित केलेले आहे. संरक्षित केलेल्या जागांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र , पाबळ फाटा जवळ, शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केटयार्ड) समोर, स्वच्छता प्रेरणा उद्यान (कचरा डेपो), सोनार आळी येथील हनुमान मंदिरा समोर या जागांना कंपाऊंड करण्यात आलेले आहे.
नगरपरिषदेने सिमेंटच्या वॉलने संरक्षित केलेल्या त्या जागेचे कंपाऊंड वॉल तोडल्याचे, वॉलवर अनधिकृतपणे रंगरंगोटी अथवा जाहिरातबाजी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर मालमत्ता विदृपीकरण कायदा 1995 अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा न्यायसंहिता अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.







