पुणे : व्हॉटसॲपच्या ‘डिपी’ ला भारतीय राजमुद्रेचा फोटो वापरुन, पोलिस खात्यात मोठे अधिकारी (आयएएस ऑफिसर) असल्याचे सांगत, वडकी परीसरात दरमहा 10 ते 15 टक्के व्याजदराने खाजगी सावकारी करणाऱ्या महिलेच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियम या कायद्याखाली खाजगी सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे.
रेणुका ईश्वर करनुरे (वय-32 वर्षे, रा. सिध्दीविनायक सोसायटी, वडकी, ता. हवेली) हे त्या गुन्हा दाखल झालेल्या खाजगी सावकाराचे नाव आहे. या प्रकरणी पुजा प्रविण मोरे (वय 31 वर्षे, रा. श्री सिद्धीविनायक पार्क वडकी) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनातील लॉकडाऊनच्या काळात पुजा मोरे यांनी रेणुका करनुरे यांच्याकडून दोन लाख अडुसष्ठ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर पुजा मोरे यांनी व्याज व मुद्दल असे मिळून रेणुका करनुरे यांना आठ लाख रुपये दिले होते. कर्जाऊ घेतलेल्या रकमेच्या तिप्पटहुन अधिक रक्कम मिळुनही, करनुरे यांनी मोरे यांच्याकडे आणखी साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र मोरे यांची परिस्थिती बेताचीच असल्याने, मोरे यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास नकार दिला होता.
दरम्यान, मोरे यांच्याकडून पैसे मिळत नसल्याचे लक्षात येताच, आपण पोलिस खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत करनुरे यांनी मोरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच स्वतःच्या मोबाईलमधील व्हॉटसॲपच्या “डिपी” ला असलेला भारतीय राजमुद्रेचा फोटो दाखवुन, पोलिस खात्याची धमकी देण्यास सुरुवात केली. या धमकीला घाबरुन अखेर पुजा मोरे व त्यांच्या कुटुबिंयांनी थेट लोणी काळभोर पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सत्यपरिस्थिती पडताळुन पाहिल्यानंतर, पोलिसांनी रेणुका करनुरे हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहेत.