पुणे : कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिराजवळ छोटा शेख सल्ला दर्गा परिसरातील बेकायदा बांधकामावर कारवाई केली जाणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरली. त्यानंतर दर्ग्याच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. परिसरात घोषणाबाजी करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. दरम्यान, दर्ग्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची अफवा पसरविणाऱ्या १२०० जणांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छोटा शेख सल्ला दर्ग्यावर कारवाई करून तो पाडण्यात येणार असल्याची अफवा शुक्रवारी रात्री पसरविण्यात आली. त्यानंतर चार ते पाच हजार जण या परिसरात जमले. समाज माध्यमातून अफवा पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला. जमाव जमल्यानंतर तातडीने पोलिसांनी जादा कुमक मागवून घेतली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी घटनास्थळी भेट दिली. जमावाला शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.
दर्गा परिसरात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर जमाव परतला. त्यानंतर शनिवारी पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. त्यात दर्ग्याच्या परिसरातील बेकायदा बांधकाम स्वत: हून काढून घेतले जाईल, असा निर्णय दर्ग्याच्या विश्वस्तांकडून जाहीर करण्यात आला. दर्ग्याच्या परिसरातील नवीन मशीद मान्य नकाशाप्रमाणे करण्यात येणार आहे. या भागात करण्यात आलेले बेकायदा वीट बांधकाम, दरवाजे, खिडक्या प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर स्वत:हून काढण्यात येणार आहे, असे विश्वस्तांनी जाहीर केले.
याप्रकरणी समाज माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या एक हजार ते १२०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.