पुणे : ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे (रा. अद्विका रेसिडेन्सी, पुनावळे, पिंपरी-चिंचवड, पुणे) याच्यासह त्याच्या कुटुंबियांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी मिनल संकल्प गोळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी पती संकल्प गोळे, सासू शोभा अजाबराव गोळे, सासरे अजाबराव मारुती गोळे, नणंद समिक्षा अजाबराव गोळे, दीक्षिता स्वप्निल जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ५ फेब्रुवारी २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनल व संकल्प यांचा विवाह ५ फेब्रुवारी २०२३ रोजी झाला. लग्नानंतर एक महिन्यांनी संकल्प हे दारू पिवून येत तिच्यावर संशय घेऊ लागले. तुझे बारामतीतील मेडिकल शॉप बंद करून पुणे येथे सुरू कर अन्यथा तुला नांदवणार नाही, घटस्फोट दे असे म्हणत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली. सासू शोभा यांनी उलट बोलते, तुला नांदवायचे नाही असे म्हटले.
नणंद समिक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरहून आण अशी मागणी सासूने केली. सासऱ्यांनी मेडिकल शॉप पुण्यात सुरू करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आण असे म्हणत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. नणंद समिक्षा व दीक्षिता यांनीही शिवीगाळ, दमदाटी केली. तिला फेब्रुवारी २०२४ मध्ये राहत्या घरातून हाकलून दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.