पुणे : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस निरिक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी दिली आहे. महेश भोईबार (वय २८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गुन्हा नोंद करुन घेण्यासाठी हिंदू संघटनेमार्फत आंदोलनही करण्यात आले आहे. यावेळी कोंढवा परिसरातील हिंदू संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर जलील यांच्याकडून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. जलील यांच्याच सांगण्यावरूनच रॅलीमधील जमावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील नामनिर्देशित फलकावरील छत्रपती संभाजीनगर या नावाला काळे फासून विद्रुपीकरण केले होते.
सदरील घटना ही जलील यांनीच घडवून आणली असल्याचे म्हणत मंगळवारी (ता. १) विविध हिंदू संघटनाच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यानुसार रात्री उशिरा कोंढवा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घेतला.
जनभावनेचा आदर करून जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर- जालना मार्गावर असलेल्या संभाजी महाराजांच्या फलकाचे विद्रुपीकरण केल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यानुसार तपास केला जाईल.
विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे