पुणे : कामशेत पोलिसांनी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मोठी कारवाई केली आहे. जुन्या महामार्गावरुन लोणावळ्याकडे गांजाची वाहतूक करणारी कार पोलिसांनी पकडली असून कारमधील चौघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९८ किलो गांजा जप्त केला आहे. अभिषेक अनिल नागवडे (वय-२४), प्रदिप नारायण नामदास (वय-२५), योगेश रमेश लगड (वय-३२), वैभव संजीवन चेडे (वय-२३, सर्व रा. पी एम टी बस स्टॉपजवळ, कारेगाव, ता. शिरुर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या महामार्गाने एका कारमधून गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहित कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे दोन पथके तयार करुन सापळा रचण्यात आला. यावेळी वेरना कार ताजे गावाकडे जात असल्याचे दिसताच पोलिसांनी छापा टाकला. कारची व डिकीची पाहणी केली असता डिकीमध्ये ९८ किलो गांजा पोलिसांना आढळून आला.
दरम्यान, पोलिसांनी ४८ लाख ५० हजार रुपयांचा ९८ किलो गांजा, ४२ हजार रुपयांचे ३ मोबाईल, ८ लाख रुपयांची वेरना कार असा ५६ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.