पुणे : पुणे – नगर रस्त्यावर अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १८) पुणे – नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली आहे. या घटनेत अन्य एक तरुण जखमी झाला आहे. अनुपम महेश असेरकर (वय २३, रा. विजयविहार हाऊसिंग सोसायटी, नगर रास्ता, वाघोली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अपघातात कारचालक देव पटनाईक (वय २३, रा. वाघोली पुणे) हा जखमी झाला आहे.
भरधाव मोटार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी देव पटनाईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुपमची आई सीमांतनी महेश असेरकर (वय-५४) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
नेमकं काय घडलं?
अनुपम आणि देव हे दोघे मित्र आहेत. दोघे जण कार मधून वाघोली-लोहगाव रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा पिण्यास गेले होते. वाघोली-लोहगाव रस्त्यावर डीमार्टजवळ समोरुन भरधाव ट्रक येत होता. रस्त्यावर अंधार असल्याने समोरुन येणाऱ्या ट्रकचा अंदाज कारचालक आला नसल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार उलटली.
या अपघातात अनुपम याला गंभीर दुखापत झाली. तर कारचालक देव किरकोळ जखम झाला. गंभीर जखमी झालेल्या अनुपम आणि देवला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अनुपम याचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.