गुजराती म्हणजे बिझनेस… ही म्हण जगभरात लोकप्रिय आहे. या म्हणीमागे केवळ अंबानी किंवा अदानीच नाहीत, तर अशी अनेक नावे आहेत ज्यांचा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश नसेलही; पण त्यांचा हा व्यवसाय काही हजार कोटींचा आहे. या गुजराती व्यावसायिकांमध्ये एक नाव आहे बिपिनभाई हदवानी. ते गोपाल स्नॅक्सचे संस्थापक आहेत. १९९१ साली त्यांनी गुजराती नमकीन आणि स्नॅक्सचा व्यवसाय सुरू केला होता, जो आज १३०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गुजरातचे व्यापारी बिपिनभाई हदवानी यांची ही कथा आहे.
वडील सायकलवर विकायचे मिठाई
राजकोटमधील एका छोट्याशा गावात राहणारे बिपिनभाई एका सामान्य कुटुंबातील होते. त्यांचे वडील गावात मिठाईचे दुकान चालवायचे आणि पारंपरिक गुजराती घरगुती मिठाई आणि स्नॅक्स सायकलवरून गावोगावी विकायचे. शाळा पूर्ण केल्यानंतर बिपिनच्या वडिलांची इच्छा होती की बिपिनने पुढे शिक्षण घ्यावे आणि कॉलेजमध्ये जावे; परंतु बिपिनची स्वप्ने वेगळी होती. त्याला राजकोट शहरात जाऊन मोठा व्यवसाय करायचा होता. ‘फोर्ब्स इंडिया’च्या म्हणण्यानुसार, आपल्या मुलाच्या स्वप्नाबद्दल कळल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना ४,५०० रुपये दिले. बिपिनच्या वडिलांना वाटले की आपला मुलगा शहरात जाऊन पैसे खर्च करेल आणि घरी परत येईल. त्यावेळी त्याला व्यवसायातही रस नसेल. पण इथे तो समज चुकीचा ठरला. कारण मोठा व्यवसाय करण्याचे बिपिनचे स्वप्न होते.
स्वप्नांचा पाठपुरावा
स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी बिपिन १९९१ मध्ये राजकोटला गेले आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांसह पारंपरिक गुजराती स्नॅक्स कंपनी गोपाल गृह उद्योग सुरू केला. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि चार वर्षांत वाढ झाली. पण काही कारणांमुळे त्यांच्या जोडीदारांशी त्यांचे पटत नव्हते. कारण बिपीन यांना काहीतरी मोठे करायचे होते पण त्यांच्या जोडीदारांची विचारसरणी वेगळी होती. तेव्हा बिपीनभाईंच्या वडिलांनी त्यांना एक सल्ला दिला, “जास्त पैसे कमवायचे असतील तर व्यवसाय वाढवा, किंमत नाही.”
१९९४ मध्ये नवीन सुरुवात
१९९४ मध्ये बिपिनभाईंनी त्यांच्या भागीदारांशी सल्लामसलत करून त्यांचा जुना व्यवसाय बंद केला. या व्यवसातून त्यांना अडीच लाख रुपये मिळाले. या पैशातून त्यांनी राजकोटमध्ये स्वत:साठी घर खरेदी केले आणि पुन्हा एकदा शून्यातून गोपाल स्नॅक्स सुरू केले. या वेळी त्यांची पत्नी दक्षा त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि व्यवसायात त्यांची भागीदार बनली. पती-पत्नीने घरातून कामाला सुरुवात केली. हा दुसरा डाव सोपा नसला तरी बिपिन आणि दक्षाकडे सत्य स्विकारण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांना सतत मेहनत करावी लागली.
ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादन
बिपिनभाई सायकलवरून राजकोटच्या रस्त्यांवर फिरले, ग्राहकांची मागणी काय आहे हे जाणून घेण्यासाठी दुकानदार, किरकोळ विक्रेते आणि डीलर्सशी बोलले. त्यांनी आपल्या फराळाची किंमत वाढवली नाही तर ग्राहकांच्या गरजा आणि मागणीनुसार उत्पादन सुरू केले. चार वर्षे अथक परिश्रम केल्यानंतर बिपिन आणि दक्षाने शहराबाहेर जमीन विकत घेतली आणि स्वतःचा उत्पादन कारखाना उभारला. त्यानंतरही हा मार्ग सोपा नसला तरी २०१२ मध्ये त्यांनी कंपनीला १०० कोटींच्या कमाईवर नेले.
“तुम्ही जे खाता तेच खायला द्या”
बिपिनभाईंनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांच्या यशात अनेक गोष्टींचा हातभार आहे. पण सर्वांत मोठा वाटा उत्पादनांच्या चव आणि दर्जाचा होता. ते चिप्स, मिठाईपासून गठिया, भाकरवडीपर्यंतचे स्नॅक्स देतात. व्यवसाय सुरू करताना त्यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला होता की, तुम्ही घरी जे खाऊ शकता तेच तुमच्या ग्राहकांना द्या. वडिलांचा हा सल्ला त्यांना नेहमीच साथ देत होता आणि आज गोपाल स्नॅक्स हा एक मोठा ब्रँड आहे.
आज त्यांचे गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सात उत्पादन कारखाने आहेत. गोपाल स्नॅक्स ११ राज्यांमध्ये विकले जाते आणि ६० उत्पादने आहेत. त्यांची उत्पादने ७० हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जातात. त्यांच्याकडे ७५० डीलर्स आणि सात लाख रिटेलर्सचे नेटवर्क आहे. बालाजीनंतर गुजराती बाजारपेठेतील ही दुसरी सर्वांत मोठी कंपनी आहे. कंपनीचा आयपीओही आला आहे, पण वडिलांनी दिलेल्या सल्ल्यानुसार बिपिनभाई अजूनही व्यवसाय करत आहेत.