पुणे : पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 42 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कात्रजच्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील व्यंकटेश ऑर्किड या सोसायटीमध्ये आणि पीरामल कॅपिटल फायनान्स तसेच आयसीआयसीआय बँकेच्या भांडारकर रस्ता शाखेमध्ये फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सदनिका खरेदीच्या बहाण्याने एकाच सदनिकेवर दोन बँकांमधून गृह कर्ज काढून बांधकाम व्यावसायिकाची 42 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 23 मे 2023 ते 29 डिसेंबर 2023 या कालावधी दरम्यान घडला आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपी निखिल किसन डांगे (वय 32, रा. सायली सोसायटी, बाणेर), पिरामल कॅपिटल अँड फायनान्सच्या बिबेवाडी शाखेचे अधिकारी तसेच आयसीआयसीआय बँकेच्या भांडारकर रोड शाखेच्या अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान 420, 467, 468,471,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनेश लक्ष्मण रासकोंडा (वय 52, रा. शंकर महाराज सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश रासकोंडा यांनी आंबेगाव बुद्रुक येथील सर्व्हे नंबर 28/9 या ठिकाणी 15 गुंठे जागा खरेदी केली होती. या ठिकाणी व्यंकटेश आर्किड या नावाने बांधकाम करण्यात आले होते.
एकूण 31 सदनिकांचे बांधकाम या गृह प्रकल्पामध्ये पूर्ण करण्यात आले होते. आरोपी निखिल डांगे याने या गृह प्रकल्पाच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 101 हा 44 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करण्याची तयारी दर्शवली होती. तसा करारनामा देखील करण्यात आला होता. आरोपीने आरटीजीएसद्वारे फिर्यादीला प्रथम दोन लाख रुपये दिले. परंतु, उर्वरित रक्कम रजिस्टर करारनामा झाल्यावर देतो असे सांगितले. मात्र, आरोपी निखिल डांगे याने काही दिवसानंतर फिर्यादी यांना भेटून करारनाम्यात तुमच्याकडून पहिल्या मजल्याचे ऐवजी दुसरा मजला असे नमूद झाल्यामुळे गृहकर्ज होत नसल्याबद्दल सांगितले. त्याकारणास्तव हा व्यवहार पुढे होऊ शकला नाही.
फिर्यादी दिनेश रासकोंडा यांना एक दिवस या सदानिकेच्या दारावर पिरामल कॅपिटल अँड फायनान्स कंपनीने लावलेली तसेच अर्धवट फाटलेली नोटीस चिकटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी या संदर्भात पिरामल कॅपिटलच्या बिबवेवाडी शाखेमध्ये जाऊन चौकशी केली. त्यावेळी निखिल डांगे याने ही सदनिका पिरामल कॅपिटल आणि फायनान्सच्या बिबवेवाडी शाखेमध्ये तसेच आयसीआयसीआय बँकेच्या भांडारकर रोड शाखेमध्ये अशा दोन्ही ठिकाणी गहाण ठेवल्याचे समजले.
यावेळी पिरामल कॅपिटल आणि फायनान्स बँकेमधून 35 लाख तसेच आयसीआयसीआय बँकेमधून 37 लाख 80 हजार 500 रुपयांचे गृह कर्ज काढले असल्याचे समोर आले. आरोपीने साई डेव्हलपर्स या नावाने पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या हिंगणे-वडगाव शाखेमध्ये बनावट खाते उघडले होते. पिरामल आणि आयसीआयसीआय बँकेमधून घेण्यात आलेल्या कर्ज रकमा पुणे मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.
ही रक्कम स्वतःच्या फायद्याकरता या खात्यातून काढून घेऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत दोन्ही बँकांच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. मात्र, त्यांना समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. या व्यवस्थापकांनी कोणतीही शहानिशा न करता आरोपीला कर्ज मंजूर केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.