पुणे : जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बोकड ठार झाला आहे. राजुरी येथील उपळी मळ्यात राहत असलेल्या कल्पना सोनभाऊ औटी यांचा शेळी पालनाचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना अचानक शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यावेळी जाऊन पाहताच बिबट्याने त्यांच्या एका वर्षीय बोकडावर हल्ला करुन फरफटत नेत असल्याचे दिसले.
त्यादरम्यान कल्पना औटी यांनी मोठ्याने आवाज केला असता बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला, परंतु झालेल्या हल्ल्यात बोकड मृत्युमुखी पडला. वनविभागाचे अधिकारी त्रिबंक जगताप व स्वप्नील हाडवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, आळे, बोरी बुद्रुक, साळवाडी, जाधववाडी, कोळवाडी, वडगाव आनंद ही गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात आहेत. या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या उसाची तोडणी संपली असल्याने या भागात असलेल्या बिबट्यांना लपून बसता येत नसल्यामुळे त्यांना खाद्य मिळत नाहीयेय. त्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करु लागले आहे.
या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी माजी सभापती दीपक औटी, राजुरीच्या सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके यांनी केली आहे.