अजित जगताप
वडूज : सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाटचालीमध्ये लघुउद्योग व शेतकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या या बँकेच्या शाखेसाठी नुकतीच गोपूज ता. खटाव येथील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे, जनता क्रांती दलाचे अध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा बँकेच्या मुख्यालयात भेट घेतली. लवकरच गोपुज या ठिकाणी जिल्हा बँकेची शाखा स्थापन होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये चैतन्य पसरले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगतशील वाटचालीमध्ये अनेकांनी योगदान दिले आहे. खटाव तालुक्यातील गोपूज व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी गावात जिल्हा बँकेची शाखा नसतानाही पळशी, वडूज, अंबवडे अशा बँकेच्या शाखेतून आर्थिक व्यवहार करून जिल्हा बँकेच्या कामकाजावर विश्वास दाखवला आहे.
सध्या गोपुज ता खटाव या ठिकाणी आठवड्याचा बाजार भरत असल्याने जिल्हा बँकेची शाखा स्थापन झाल्यास अर्थकारणाला गती प्राप्त होईल. तसेच ग्रामीण भागातील जीवनमान उंचावे या दृष्टीने जनता क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सत्यवान कमाने, ऍड संतोष कमाने, प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे व पत्रकार अजित जगताप, युवा नेते सोहिल मुलाणी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, संचालक प्रदीप विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच ग्रामस्थांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्याशी संपर्क साधून जिल्हा बँकेची शाखा गोपुजमध्ये व्हावी यासाठी सकारात्मक चर्चा केलेली आहे लवकरच रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मान्यतेनुसार गोपू शाखेचे धुमधडाक्यात उदघाटन होणार आहे.
या घडामोडीमुळे गोपुज गावच्या विकासामध्ये मानाचा तुरा रोवला जाईल असे वाटू लागले आहे. किमान दोन ते तीन कोटी ठेवी व एक ते दीड कोटी कर्ज प्रकरण होऊन या बँकेच्या प्रगतीला हातभार लावला जाईल असे बँकिंग क्षेत्रातील तज्ञ मंडळींना वाटू लागली आहे.