पुणे : मेफेड्रोन तस्करी मोठी अपडेट समोर येत आहे. गुन्हे शाखेने पुणे आणि दिल्लीतील गोदामात छापे टाकले. मेफेड्रोनसाठी लागणारा कच्चा माल पुरविणारा आरोपी पप्पू कुरेशी याने भाडेतत्वावर घेतलेल्या गोदामातून १६ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम १५० मिलिग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जप्त केले.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मेफेड्रोन तस्करी प्रकरणात फरार असलेला आरोपी मोहम्मद उर्फ पप्पू कुतूब कुरेशी (रा. केसनंद) याला कर्नाटकातील यादगीर भागातून नुकतीच अटक करण्यात आली. कुरेशीने साथीदार हैदर शेख, अशोक मंडल, संदीप धुनिया आणि शोएब शेख यांच्याशी संगमनत करून पुणे आणि दिल्लीतील गोदामात मेफेड्रोन ठेवले होते. याबाबतची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने दिल्ली आणि पुणे परिसरातील गोदामात छापे टाकून १६ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे ८२ ग्रॅम १५० मिलिग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. आता कुरेशी याच्या पोलीस कोठडीची मुदत संपली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. कुरेशीने अमली पदार्थांचा साठा अन्य ठिकाणी ठेवला का? यादृष्टीने तपास करायचा आहे.
कुरेशी याच्याकडे सांगली आणि दिल्लीत मेफेड्रोन वितरित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील कारखान्यात मेफेड्रोन तयार करण्यासाठी कच्चा माल कुरेशी पुरवित होता, असे सरकारी वकील ॲड. नीलीमा इथापे-यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तपासासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची विनंती त्यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी कुरेशीच्या पोलीस कोठडीत सहा दिवसांनी वाढ केली.