पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे बघायला मिळत आहे. अशातच पुण्यामधून एक मोठी राजकीय घडामोड गळ्याचे समोर आले आहे. पुणे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली असताना, मात्र आता भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना देखील पक्षांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. ते वडगाव शेरी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच जगदीश मुळीक यांनी ‘मी अर्ज भरणार नाही’ म्हणत यु टर्न घेतला आहे.
नेमकं घडलं काय?
भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांना भाजपकडून एबी फॉर्म देण्यात आला होता आणि ते फॉर्म घेऊन अर्ज भरण्यासाठी येरवड्याच्या क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाले. मात्र उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वीच देवेंद्र फडणीस यांचा फोन आला आणि जगदीश मुळीक यांनी अर्ज भरणार नसल्याचे जाहीर केले. वरिष्ठांनी आदेश दिले आणि भाजपात दिलेल्या आदेशांचं पालन केलं जातं. आम्हाला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचा आहे म्हणून मी अर्ज भरणार नाही असं जगदीश मुळीक यांनी जाहीर केलं आहे. यावेळी मात्र जगदीश मुळीक यांच्यासोबत आलेले शेकडो कार्यकर्ते नाराज झाले असल्याचे दिसून आले. जगदीश मुळीक तुम्ही फॉर्म भरा आणि तुमच्या सोबत आहोत अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.
मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता : जगदीश मुळीक
फॉर्म भरत असताना देवेंद्र फडणवीसांचा फोन आला. फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यानंतर आम्ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया थांबवली आहे. भाजप पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली त्याबाबत पक्षांचं आणि पक्षातील नेत्यांचा मी आभारी आहे, पक्ष मला जो आदेश देईल त्याचं मी पालन करणार आहे, मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे.
सुनील टिंगरे यांना महायुतीकडून उमेदवारी..
वडगाव शेरीचे विद्यमान उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे सुनील टिंगरे आहेत. टिंगरे यांचं नाव कल्याणीनगरच्या पोर्शे प्रकरणात आल्याने त्यांची उमेदवारी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्याना यावेळी डावललं जाईल असच चित्र होतं. मात्र टिंगरेंचं नाव दुसऱ्या उमेदवार यादीमध्ये जाहीर करण्यात आलं. त्यानंतर पुन्हा जगदीश मुळीक यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप सुरुवातीपासून आग्रही होते. त्यानंतर जगदीश मुळीक यांना भाजप पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यानंतर ते फॉर्म भरण्यासाठी गेले असता त्यांना फडणवीसांचा फोन आला आणि त्यानंतर ते फॉर्म न भरताच माघारी आले.