जेजुरी : जेजुरी येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणाच्या जवळ कऱ्हा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हि घटना 12 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. विराज सतीश कापरे (वय-7 रा. नाझरे सुपे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, विराज हा आपल्या मित्रांसोबत कऱ्हा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेला होता. तो गेल्या काही दिवसापासून पोहायला शिकत होता. पोहताना त्याला काही होऊ नये म्हणून त्याच्या सुरक्षिततेसाठी कमरेला तसेच पाठीला ड्रम बाधण्यात आला होता.
दरम्यान, पोहत असताना त्याच्या कमरेला बांधलेला ड्रम सुटला आणि तो नदी तिराजवळ जात असताना अचानक पाण्यात बुडाला. विराज बराच वेळ घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, त्याचा मृतदेह कऱ्हा नदी पात्रात आढळून आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. नाझरे गावासह आस-पासच्या भागातील नागरिकही शोकमग्र झाले होते. पोहायला गेलेल्या ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.