पिंपरी : तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या खिडकीतून खाली डोकावताना तोल गेल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अवघ्या चार वर्षांच्या मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ८) सकाळी चाकणजवळील आंबेठाण गावातील साईबाबा पॅराडाईज येथे घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दुर्वेश ज्ञानेश्वर कारवार (वय ४, रा. साईबाबा पॅराडाईज, आंबेठाण) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. दुर्वेश सकाळी बेडरुममध्ये खेळत होता. खेळता खेळता तो बेडरूमच्या खिडकीजवळ गेला. खिडकीतून तो खाली पाहण्याचा प्रयत्न करत होता, त्यावेळी त्याचा तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली.
दरम्यान, घटना घडली त्यावेळी घरामध्ये त्याची बहीण, काकू आणि आजी होती. तर त्याचे आई-वडिल कामावर गेले होते. घरातल्या मंडळींनी तातडीने दुर्वेशला नाणेकरवाडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे चाकण पोलिसांनी सांगितले.
दुर्वेश याची मावशी जयश्री कारवार यांनी या घटनेची माहिती चाकण पोलिसांना दिली. चाकण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दुर्वेशच्या अचानक जाण्याने कारवार कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्याच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.