लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील एका ३५ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.१८) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
वसंत पन्नालाल जाधव (वय-३५, रा. गोसावीवस्ती,थेऊर, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, थेऊर येथे बुधवारी (ता.१७) अखंड हरीनाम सप्ताहाचा कार्यक्रम होता . या कार्यक्रमात जाधव यांची खूप धावपळ झाली होती. त्यानंतर संध्याकाळी जाधव यांच्या छातीत वेदना होत होत्या. परंतु, कार्यक्रमात खुप धावपळ झाली असल्याने दुखत असेल, असे जाधव यांना वाटले.
त्यानंतर जाधव हे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात नेले. परंतु, तेथील डॉक्टरांनी जाधव यांचा उपचारापूर्वीच निधन झाल्याचे घोषित केले.
दरम्यान, वसंत जाधव हे एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होते. जाधव यांचे तरुण वयातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असल्याने, थेऊर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.