दौंड, (पुणे) : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत स्त्री जातीचे तीन महिन्याचे बाळ आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. २७) उघडकीस आली आहे.
एकीकडे बेटी बचाओ- बेटी पढाओचा नारा सुरु असतांना स्त्री जातीचे बाळ मिळून आल्याने रावणगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात पालकांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रावणगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत शुक्रवारी ईश्वर रांधवन यांच्या शेताजवळ महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील चरित एका बाळाचा रडण्याचा आवाज येत होता.
बाळाचा रडण्याचा आवाज आल्याने शेजारी राहणारे शेतकरी ईश्वर रांधवन, अनिकेत रांधवन, युवराज रांधवन हे आवाजाच्या दिशेने गेले. यावेळी त्यांना अंगावर लाल रंगाचा श्वेटर व गुलाबी रंगाच्या शालीत गुंडाळून ठेवलेले एक बाळ रडत असलेल्या अवस्थेत दिसून आले. रांधवन कुटुंबियांनी संबंधित बाळाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच आजूबाजूच्या नागरिकांना विचारपूस केली मात्र कोणीही ओळखत नसल्याची माहिती दिली.
दरम्यान, सदरची घटना त्यांनी दौंड पोलिसांना सांगितली. त्यानुसार तत्काळ दौंड पोलिसांनी सदर ठिकाणी भेट दिली. याबाबत पद्माकर कांबळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात पालकांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.