लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोने एका २७ वर्षीय तरुणाला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात रविवारी (ता. २१) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डगडीया रामसिंग भिलाला (वय-२७, बोरकरवस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन सखाराम भोसले (वय ३८, रा. केडगांव चौफुला, बोरीपार्धी ता. दौंड जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महेश ज्ञानेश्वर करे ( पोलीस नाईक ११३० लोणी काळभोर पोलीस ठाणे) यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डगडीया भिलाला हा वीटभट्टी कामगार असून तो कुटुंबासोबत बोरकरवस्ती परिसरात राहत आहे. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे भिलाला हा कामाला चालला होता. भिलाला हा स्वस्तीक नर्सरी समोरून पुणे सोलापूर महामार्ग ओलांडत असताना, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली.
या अपघातात डगडीयाच्या डोक्यात मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात टेम्पो चालक सचिन भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार करीत आहेत.