उरुळी कांचन : वयोमानानुसार वृद्ध लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असते, ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निरोगी तरुणांचा देखील अचानक मृत्यू होऊ शकतो. अशीच एक दुर्दैवी घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. आई वडिलांचा आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाचा उच्च रक्तदाबाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
सिराज हसन शेख (वय-19, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिराज शेख यांची घरची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. म्हणून त्याने उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातून दहावीचे शिक्षण घेतल्यानंतर काम करण्याचा निर्णय घेतला. आणि सिराज हा एका चिकनच्या दुकानात काम करू लागला.
दरम्यान, सिराजची शनिवारी (ता.6) दुपारच्या सुमारास अचानक तब्येत बिघडली. त्याला एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता, तेव्हा सिराजचा उच्च रक्तदाब वाढला होता. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. 7) सिराजच्या पालकांनी उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा सिराजच्या उपचारासाठी खूप मोठा खर्च येणार होता. त्यामुळे सिराजच्या पालकांनी त्याच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार करण्याचा निर्णय घेतला. सिराजला उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्याची तब्येत खालावली व तो ब्रेन डेड झाला. आणि सोमवारी (ता.8) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील आणि बहिण असा परिवार आहे.
एकुलता एक मुलगा हरपल्याने कुटुंबावर दुख:चा डोंगर
सिराजचा स्वभाव हा शांत व संयमी होता. घरच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याने त्याने काम करण्याचा निर्णय घेतला होता. आणि काम करून तो कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी वडिलांना मदत करीत होता. मात्र सिराजचा उच्च रक्तदाबाने मृत्यू झाला. आणि शेख कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपला. त्याच्या अचानक निधनाने शेख कुटुंबावर दुख:चा डोंगर पडला आहे. तर त्याच्या निधनामुळे उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.