पुणे : पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा रागातून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना शहरातील वाघोली परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजू लोहार (वय-४६) असं खून केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि मयत दोघेही वाघोलीतील दरेकर वस्ती परिसरात राहण्यास आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचे होते. दरम्यान आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोघेही मद्यप्राशन करत बसले होते. यावेळी त्यांच्या किरकोळ कारणावरून वाद झाला. याच वादातून मयत राजू लोहार यांनी आरोपीला उद्देशून तुझा बाप टकल्या आहे, असे म्हंटले.
याचाच राग आल्याने आरोपी अल्पवयीन तरुणाने राजू लोहार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. शेजारीच पडलेला भला मोठा दगड उचलून आधी त्याच्या पाठीत आणि नंतर छातीत मारला. दगडाचा घाव वर्मी लागल्याने राजूचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी राजू लोहार यांच्या मुलाने तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास वाघोली पोलीस करत आहेत.