पुणे : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून एका १५ वर्षीय विशेष मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी गणेश वानखेडे (वय ४०) या नराधमाला अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकणी पीडित मुलीच्या चुलतीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या काका-काकीसोबत राहते. ती मानसिक रुग्ण (मतिमंद) असल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, रविवारी (ता. १७) ती घराबाहेर उभी असताना घरासमोरील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आरोपीने तिला आवाज देऊन आपल्या घरी बोलावले. आपण दोघे मिळून खेळूया, असे म्हणून त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केले.
घडलेल्या घटनेनंतर दोन दिवसांनी पीडित मुलीने काकीला आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार केली. अचानक पोटात दुखत असल्याने काकीला संशय आला. तिने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने घडलेला सर्व प्रकार काकीला कथन केला.
घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या चुलतीने अखेर पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली आहे. मात्र, घटना घडून पाच दिवस उलटूनही माध्यम प्रतिनिधींना या प्रकरणाची माहिती देण्यास वाकड पोलिसांनी टाळाटाळ केली.