पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टॅटू काढण्यासाठी, मौजमजेसाठी पैसे मिळावेत, यासाठी एका पंधरा वर्षांच्या मुलाला घरातील १ लाख ४० हजार रुपयांची मोहनमाळ चोरी करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. ११) घडला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका २४ वर्षीय तरुणीविरोधात आणि अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीची व फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलाशी मैत्री झाली. तरुणीच्या सांगण्यावरून मुलाने घरातील कपाटातील फिर्यादीच्या आईची १ लाख ४० हजार रुपयांची साडेतीन तोळ्यांची सोन्याची मोहनमाळ चोरली आणि ती या तरुणीला आणून दिली. तिने या मुलाची आई आजारी आहे, असे सांगून दुसऱ्या तरुणाला ही मोहनमाळ विकली. त्याचे पैसे ही तरुणी व फिर्यादीचा मुलगा यांनी मजा करण्यासाठी आपल्याकडे ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर कदम करत आहेत.