लोणी काळभोर (पुणे) : घरासमोर अंगणात खेळताना एका १४ वर्षाच्या मुलाला पिसाळलेल्या कुत्रा चावल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवडीजवळ असलेल्या टाकेचा माळ परिसरात घडली आहे.
ओम शिवाजी कांबळे (वय-१४ वर्ष रा टाकेचा माळ, लोणी काळभोर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार व्ही एन जाधव यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम कांबळे हा नेहमीप्रमाणे शुक्रवारी (ता.१) घरासमोर खेळत होता. खेळत असताना ओम ला पिसाळलेल्या कुत्र्याने दुपारच्या सुमारास चावा घेतला. त्यानंतर ओमला तातडीने ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, शनिवारी (ता.२) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ओमचा मृत्यू झाल्याचे ससून हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर ओम च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार व्ही एन जाधव यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.