सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी आलेल्या मजुराचा तेरावर्षीय मुलगा नीरा डावा कालव्यावर पोहायला गेलेला असताना बुडाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता. १५) सकाळच्या सुमारास घडली आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुनील किसन चवासे (वर्ष १३, रा. इगणवाडी, ता. शिरूर कासार, जि. बीड) असं बुडालेल्या मुलाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमेश्वर कारखान्याच्या तळावरील सुनील चवासे हा तेरावर्षीय मुलगा आईवडील ऊसतोडीला गेलेले असताना सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास कारखान्यानजीक लोखंडी पुलाजवळ नीरा डावा कालव्यात पोहायला गेला होता. त्याच्यासोबत दोन लहान मुलेदेखील होती. सुनील याने कालव्याच्या काठावरून पाण्यात सूर मारला. मात्र, कदाचित डोक्याला मार लागल्याने तो पुन्हा पाण्यातून वर येऊ शकला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी अन्य ऊसतोड मजुरांना दिली. रविवारी दिवसभर ऊसतोड मजुर, काररखान्याचे कर्मचारी, वडगाव निंबाळकर पोलिस कालव्याच्या काठाने शोध घेत होते. सोमवारी सकाळीसुद्धा शोध घेतला. अखेर तहसीलदार गणेश शिंदे यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकास बोलावले. दुपारी अडीचपासून पंधरा जणांच्या पथकाने कालव्यात शोधमोहिम सुरू केली होती. मात्र अद्यापही मुलगा सापडला नसल्याने मजुरांच्या तळावर शोककळा पसरली होती.