वाघोली : अभ्यास करण्यावरून आई रागवल्यामुळे घरातून निघून गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा लोणीकंद पोलिसांकडून चार तासात शोध घेण्यात आला. मुलीला शोधून पोलिसांनी तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले. केसनंद येथे ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केसनंद येथील १२ वर्षीय शर्वरी वैजनाथ कदम ही मुलगी शनिवारी आठ वाजण्याच्या सुमारास घरातून निघून गेली होती. रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलिसांना ही माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ तीन पथके तयार करून तिचा शोध घेण्यास सुरू केला.
या परिसरातील विविध ठिकाणचे सी सी टिव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. तीन पथके विविध भागात तिचा शोध घेत होते. एका सी सी टीव्ही कॅमेऱ्यामध्ये ती शिवालय मंदिराकडे जाताना दिसली. अखेर शिवालय मंदिर येथे ती दिसून आली. अभ्यासावरुन आई रागवल्याने ती घरातून निघून या मंदिरात आली.असे तिने पोलिसांना सांगितले.
रात्री दोन वाजता हा शोध थांबवून पोलिसांनी तिला कुटुंबियांकडे सुपूर्त केले. चार तासात पोलिसांनी तत्परतेने परिसर पिंजून काढून तिचा शोध घेतल्याने केसनंद ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ही कामगिरी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण व कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.