पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोड बोलून एका रिकाम्या खोलीत नेऊन १२ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रहाटणी बसस्टॉपपासून गोंडांबे चौकाकडे जाणार्या रोडवर साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. उदय मारुती लोखंडे (वय-१८, रा. वैदवाडी वस्ती, पिंपळे गुरव, सांगवी) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा १२ वर्षाचा मुलगा रहाटणी बसस्टॉपपासून गोंडांबे चौकाकडे पायी चालला होता. त्यावेळी दुचाकीवरुन अज्ञात व्यक्ती त्याच्या जवळ आला. चल तुला तुझ्या घरी सोडतो, असे सांगून त्याला दुचाकीवर बसवून सांगवी येथील मैदानाजवळील परिसरातील रिकाम्या खोलीमध्ये घेऊन गेला.
दरम्यान, तेथे त्याने या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक संभोग केला. तसेच झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले, तर तुला मारुन टाकीन अशी धमकी देखील दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांना या नराधमाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठिकल्या आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करीत आहेत.