पुणे : घरी किरकोळ झालेल्या वादातून १० वर्षाची मुलगी शाळेतून घरी न जाता रागावून थेट घरातून निघून गेल्याची घटना घडली होती. ही घटना भारती विद्यापीठ येथील थोरवे शाळेच्या परिसरात शुक्रवारी (ता. 21) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून मुलीला अवघ्या १२ तासाच्या आत तिच्या पालकांच्याकडे सुखरूप स्वधीन केले आहे. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ येथील थोरवे शाळेमधून ही मुलगी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली. पण, ती घरी पोहचलीच नाही. तेव्हा तिच्या नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी शाळेतील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता. ती मुलगी शाळेतून बाहेर पडलेली दिसली. त्यानंतर मुलगी एका बसस्टॉपवर गेली.
याबाबत पोलिसांनी मुलीच्या वडिलांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, या बसस्टॉपवरुन आम्ही स्वारगेटला नेहमी जातो व तेथून पुढे बसने आळंदीला जात असल्याचे सांगितले. मुलीचे वडिल हे आळंदीमधील एका मठात नेहमी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनाही मुलगी आळंदीला गेली असल्याची दाट शक्यता वाटली.
त्यानंतर पोलिसांनी स्वारगेट येथील सीसीटीव्ही तपासले व तेव्हा आळंदीला जाणाऱ्या बसस्टॉपवर ही मुलगी दिसून आली. त्यानंतर पोलीस पथक आळंदीत दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने आळंदीत शोध घेतला असता, मुलगी मध्यरात्री दीड वाजता आळंदी येथे सापडली. त्यानंतर पोलिसांनी मुलीला सुखरूप पालकांकडे सुपूर्त केले. पोलिसांनी अवघ्या १२ तासाच्या आत मुलीचा शोध लावल्याने भारती विद्यापीठ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.