पुणे : महाराष्ट्रात 288 विधासभेच्या जागांसाठी रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (ता.29) संपलेली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 995 इच्छुक उमेदवार उतरले असून आपले नशीब आजमवणार आहेत. या उमेदवारांनी जवळपास एकूण 10 हजार 905 उमेदवारी अर्ज केले आहेत. तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे.
पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी 1272 उमेदवारांनी 2506 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 99 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर दौंड आणि कसबा मतदारसंघातून सर्वांत कमी 42 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे यंदाच्या वर्षीची निवडणूक ही अधिक रंजक होणार असून निकालांवर अपक्षांचा प्रभावही मोठ्या प्रमाणात असेल असं उमेदवारांची संख्या पाहून सांगितलं जात आहे.
दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची आज बुधवारी (ता.30) दुपारी 3 वाजेपर्यंत छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या निवडणूक प्रक्रियेत 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. जनता 20 नोव्हेंबरला गुप्त पद्धतीने मतदान करणार आहे. व उमेदवारांचे भवितव्य बंद पेटीत बंद असणार आहे. याची मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.