पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला एकतर्फी विजय मिळाला असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. यानंतर सातत्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. या विरोधात 95 वर्षाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे.
राज्यघटना आणि लोकशाहीची सध्या थट्टा सुरू असल्याची टीका करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आजपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण करणार आहेत. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध आकडेवारीचे दाखले देत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. महायुतीला मिळालेल्या या मोठ्या विजयमागे ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या ईव्हीएम विरोधात विविध ठिकाणी आंदोलन सुद्धा करण्यात आले आहे.
पुण्यात सुद्धा अशाच प्रकारचे आंदोलन सुरू करण्यात आले असून याबाबत बाबा आढाव म्हणाले की, निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे. त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे हे मात्र अनाकलनीय आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता आहे. या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचे वस्त्रहरण करण्यात आले आहे. असे आढाव म्हणाले.