पुणे : पुण्यातील खडकी परिसरात एक संतापजनक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या गेटवर स्कुल व्हॅनची वाट पहात थांबलेल्या ९ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला किचन दाखवतो, असं सांगून तिला एका खोलीत ओढून घेऊन नेत सुरक्षा रक्षकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
आशिष रावत (वय-४९, रा. पड्याळवस्ती, औंध रोड, खडकी) असं विनयभंग केलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याबाबत एका ४२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पड्याळ वस्ती येथील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. फिर्यादी यांची ९ वर्षाची नात शाळेत जाण्यासाठी त्यांच्या सोसायटीच्या गेटमध्ये स्कुल बस व्हॅनची वाट पहात थांबली होती. त्यावेळी आरोपी आशिष रावत याने तिला जवळ बोलावून घेत तिच्या गालाचे चुंबन घेतले.
ती तेथून गेटचे बाहेर जात असताना त्याने तिला पुन्हा बोलावून चल तुला किचन दाखवितो, असं सांगून तिला त्याच्या खोलीत ओढून नेत तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक दिघे तपास करत आहेत.