खेड (पुणे) : पुण्यातील खेड येथे वडिलांबरोबर पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दुर्वेश संदेश हजारे (वय-९ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना खेड तालुक्यातील कनेरसर येथे सडकवस्ती रविवारी (दि. ६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कनेरसर येथील सडकवस्ती येथे दुर्वेश हजारे हा नऊ वर्षीय चिमुकला वडिलांबरोबर विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. दूर्वेशच्या पाठीला बांधलेले पेटे सुटल्यामुळे तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक लोकांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला. मात्र, दुर्वेशचा मृतदेह मिळाला नाही.
स्थानिक रहिवासी, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर काही कालावधीनंतर दुर्वेशचा मृतदेह हाती लागला. या घटनेने गावात शोककळा पसरली असून दुर्वेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.