बाणेर (पुणे) : बाणेर येथे गणराज चौकाजवळील मुख्य रस्त्यावरून शाळेतून घरी निघालेल्या एका ९ वर्षांच्या मुलाच्या डोक्यात शेजारीच सुरू असलेल्या बांधकामावरील सळई पडली. या अपघातात मुलाच्या डोक्याला जबर मार लागून तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान या बालकाचा दर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव रुद्र केतन राऊत (वय ९) असे आहे. रुद्रच्या अचानक जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिसांमध्ये या संदर्भात बिल्डर आणि साईट इंजिनिअरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाणेर येथे गणराज चौकाजवळ मुख्य रस्त्यावर केतन वीरा बिल्डरचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या बिल्डिंगचे काम सुरू असताना या बिल्डिंगवरून सळई मुख्य रस्त्यावर पडली. त्याच दरम्यान रुद्र राऊत हा शाळेतून घरी परतत होता. त्याच्या डोक्यात लोखंडी सळई पडल्याने तो गंभीर जखमी झाला. रक्तस्त्राव झाल्याने तातडीने त्याला जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
चौकामध्ये बांधण्यात येत असलेली ही इमारत मुख्य रस्त्यावर असून देखील अत्यंत कमी फ्रंट मार्जिनवर या इमारतीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इमारतीचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडते. तसेच कमी फ्रंट मार्जिन असल्यामुळे भविष्यात देखील या परिसरातील मुख्य रस्त्यावर व चौकामध्ये वाहतूक समस्या तसेच अपघातांचे प्रमाण वाढणार आहे. मुख्य चौकामध्ये एवढ्या कमी फ्रंट मार्जिनमध्ये बांधकामाला परवानगी कशी दिली? बांधकामावर सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन का केले नाही. इमारतीच्या बाबतीत अनेक त्रुटी असताना देखील पालिका अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत? असे प्रश्न या अपघाताच्या निमित्ताने विचारले जात आहेत. याची सखोल चौकशी करून बांधकाम व्यावसायिकावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत व बांधकामाला परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिक करत आहेत.
बांधकाम सुरु असताना बिल्डरक़डून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने अपघात होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. यामुळे निरपराध व्यक्तींचे बळी जात आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा बिल्डरच्या हलगर्जीपणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.