पिंपरी : हॉस्पिटलचे बांधकाम सुरु असताना स्लॅब कोसळून 9 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथील अजिंक्य डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये मंगळवारी 18 जून रोजी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दिघी पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार अनिल रामचंद्र शिंदे (वय-36) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कारपेंटर कॉन्ट्रॅक्ट मोहंमद अबरार आलम आणि काँक्रेटचे कॉन्ट्रॅक्टर मोहंमद रशीद राजा यांच्यावर भादंवि कलम 337, 338, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथे अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॅम्पसमध्ये हॉस्पिटलच्या इमारतीचे काम सुरु आहे. इमारतीच्या समोरील पोर्चचे बांधकाम मंगळवारी सुरू होते. या पोर्चवर स्लॅब टाकताना स्लॅबच्या खालील बाजुस लावलेल्या सपोर्टची योग्य ती काळजी न घेतल्याने स्लॅब कोसळला. या घटनेत नऊ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी स्लॅब टाकताना निष्काळज पणा केल्यामुळेच हा अपघात घडून नऊ कामगार जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.