हडपसर : हडपसरमधील प्रकाश अण्णा गोंधळे प्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या तब्बल ९ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ वर्षे, फौजदारी कलम ७ च्या तरतुदीनुसार ६ महिने आणि प्रत्येक आरोपीला २० हजार रूपये दंड सुनावण्यात आला आहे. हा निकाल सत्र न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांनी दिला आहे.
विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे, अमोल शेडगे, राहुल कौले, विकी पाटील, सुरज फडके आणि आकाश शिंदे अशी हिंदू राष्ट्रसेनेतील शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाशिवाय आरोपींनी १ लाख ५० हजार रूपये प्रकाश गोंधळे यांच्या परिवाराला द्यावे असे आदेशात सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०१३ मध्ये रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रकाश गोंधळेंच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. दरवाजा पेट्रोल टाकून जाळून टाकला आणि हौदोस घातला. त्याबाबत प्रकाश गोंधळेंनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. वेळावेळी पाठपुरावा केल्यानंतर देखील गोंधळेंच्या घरावर हल्ला करणार्यांना अटक झाली नाही.
दरम्यान, संध्याकाळी गोंधळे हे घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना अडविले आणि त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांचा खून केला. खटल्यात विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. खटल्यादरम्यान न्यायाधीशांनी एकुण १९ साक्षीदार तपासले. आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.