पुणे : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आता मैदानात उतरले असून एकमेकांविरुद्ध टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील हायहोल्टेज लढत म्हणून बारामतीकडे पाहिलं जात आहे. अशातच आता शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी पहिल्यांदाच थेट अजित पवारांवर टीका केली आहे. बारामतीच्या विकासासाठी 9 कोटी खर्च केले मग विकास कुठे आहे? असा थेट प्रश्न युगेंद्र पवार यांनी अजितदादांना विचारला आहे.
‘दादा म्हणतात बारामती विकासाला 9 कोटी खर्च केलेत. मग विकास कुठंय? फक्त ठेकेदारांचे खिसे भरले म्हणजे विकास होत नाही. बारामतीला अजित दादांनी हायफाय बसस्टँड बांधलं पण एसटी बसेसचं काय? ग्रामीण भागात लोकांना एसटी मिळत नाहीत, असं म्हणत युगेंद्र पवार यांनी अजितदादांवर पहिल्यांदाच निशाणा सढळ आहे.
‘पवार फॅमिली फुटली हे दुर्दैवी आहे. अजितदादा आज गोविंदबागेत भाऊबिजेला आले नसले तरी मी आलोय ना? आमचा सगळा परिवार होता. फक्त साहेब आणि दादा नव्हते, असंही ते म्हणाले. ‘बारामतीत भाजपचे जेवढे जास्त नेते माझ्या विरोधात उतरतील तेवढाच माझा विजय पक्का होत जाणारा आहे. अजितदादा बारामतीच्या विकासाबाबत कितीही बोलत असले तरी बारामती अजूनही समतोल विकास झालेला नाही आणि तोच समतोल विकास करण्यासाठी मी शरद पवारांचा उमेदवार म्हणून मैदानात उभा आहे, असंही युगेंद्र पवारांनी सांगितलं.